अभिनेत्री इंदिरा कृष्णन (Indira Krishnan) रामायण चित्रपटात कौशल्या मातेची भूमिका करत आहेत. NDTV ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी म्हटलं, ‘हे अगदी जणू ब्रह्मांडाने घडवून आणलं आहे,’ असं त्या हसून म्हणाल्या. ‘माझं एक स्वप्न होतं की रणबीर कपूरची आई व्हावी आणि शेवटी ते पूर्ण झालं!’

इंदिरा यांनी सांगितलं की हे सगळं सुरू झालं २०२३ मधील अॅनिमल चित्रपटाच्या शेवटच्या शूटिंगच्या दिवशी. या चित्रपटात त्यांनी गीतांजली (रश्मिका मंदान्ना) ची आई ही छोटी पण लक्षात राहणारी भूमिका केली होती.
रणबीर आणि मी शूटिंगदरम्यान गप्पा मारत होतो, तेव्हा रश्मिका म्हणाली, ‘मॅम, तुमच्यासोबत काम खूप छान वाटलं, पुन्हा एकदा तुम्ही माझी आई व्हा’. मी तिला म्हणाले, ‘आता मला रणबीरची आई व्हायचंय’. दोन वर्षांनी, अगदी तसंच झालं. मला रामायण साठी बोलावलं गेलं.
जेव्हा मी ऑफिसमध्ये पोहोचले, तिथे रणबीर, साई पल्लवी, रवी दुबे होते. माझं नेमप्लेट टेबलवर होतं. मला वाटलं मी स्वप्न पाहतेय. ऑफिसमध्ये गेल्यावर रणबीरने (Ranbir Kapoor) विचारलं, ‘तुम्ही दोन वर्षांपूर्वी काय म्हणाल्यात ते लक्षात आहे का?’ मी म्हटलं, ‘तुला आठवतंय?’ तो म्हणाला, ‘हो! बघा, तुम्ही आता माझी आई झाला आहात.’ हे खरंच स्वप्नासारखं वाटत होतं.
चित्रपटाच्या भव्य तांत्रिक पैलूंवर बोलताना त्यांनी सांगितलं, ‘जेव्हा माझं बॉडी मेजरमेंट घेण्यासाठी बोलावलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की ही तीच मशीन आहे जी इंटरस्टेलर चित्रपटासाठी वापरली गेली होती. ८६ कॅमेऱ्यांचं सेटअप होतं, आणि एकाच वेळी सगळे कॅमेरे फ्लॅश झाले — मी थक्क झाले. मला वाटलं की हे फक्त कॉस्ट्युम फिटिंगसाठी आहे, पण ते VFX साठी होतं.’
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याबद्दल त्या म्हणाल्या, ‘ते दृश्य कथन करताना तुम्ही प्रत्यक्ष त्या प्रसंगात जगत असता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कलाकारांवर पूर्ण विश्वास ठेवतात.’ त्यांनी Prime Focus आणि VFX टीमचं कौतुक केलं, विशेषतः प्रमुख जयकर यांचं. ‘इतक्या मोठ्या स्टारकास्टला एकाच फ्रेममध्ये आणणं आणि त्यावर इतकं बारकाईने काम करणं खूप कठीण असतं.’
रामायण चित्रपटात रणबीर कपूर (राम), साई पल्लवी (सीता), यश (रावण), सनी देओल (हनुमान), रवी दुबे (लक्ष्मण) यांच्या भूमिका आहेत. कहानी घर घर की, अफसर बिटिया, दुर्गा – अटूट प्रेम कहानी अशा मालिकांमध्ये काम केलेल्या इंदिरा कृष्णन यांनी तेरे नाम, हॉलिडे यांसारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
