रणवीर सिंगचा रौद्र अवतार ‘धुरंधर’ टीझरमध्ये; “बिगाड़ने का वक्त आ गया है”

रणवीर सिंगचा (Ranveer Singh) आगामी चित्रपट धुरंधरचा पहिला लुक अखेर प्रेक्षकांसमोर आला असून, या लुकने चाहत्यांमध्ये उत्सुकतेचा धुरळा उडवला आहे. उरी आणि द इमोर्टल अश्वत्थामासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारल्या जाणाऱ्या धुरंधरमध्ये रणवीर एका अगदी वेगळ्या आणि प्रखर भूमिकेत दिसणार आहे.

Ranveer Singh dhurandhar 04

या फर्स्ट लुकमध्ये रणवीर सिंग लांब केस, तोंडात सिगारेट आणि प्रचंड रागाने भरलेला चेहरा घेऊन दिसतो. पार्श्वभूमीला धमाकेदार संगीत आणि थरारक अ‍ॅक्शन सीनसोबत रणवीरची शैलीदार अ‍ॅग्रेसिव्ह मूव्ज प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवतात. ‘धुरंधर’ची ही झलक रणवीरच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचं दिसून येतं.

फक्त रणवीरच नव्हे, तर निर्मात्यांनी चित्रपटातील इतर प्रमुख कलाकारांचे लुक्सही एकाच वेळी प्रदर्शित केले आहेत. यामध्ये संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांचा समावेश आहे. सर्व कलाकारांची उग्र आणि गूढ लुक्स प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आणत आहेत.

Ranveer Singh dhurandhar 03

या लुकच्या प्रकाशनाला एक खास संदर्भही आहे. ६ जुलै रोजी रणवीर सिंगचा वाढदिवस असून त्याच्या एक दिवस आधीच त्याने आपले सर्व इन्स्टाग्राम पोस्ट्स हटवले. त्याने दोन तलवारींचे इमोजी आणि “12:12” असे लिहून एक स्टोरी शेअर केली होती. चाहत्यांनी यामागील अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि आता हे स्पष्ट झालं आहे की रणवीरने आपली सोशल मीडियाची स्टेज धुरंधरच्या (Dhurandhar) पहिल्या लुकसाठी तयार ठेवली होती.

यामागे दिग्दर्शक आदित्य धरचा मास्टर प्लॅन होता. त्यांनी रणवीरसाठी हे एक गुप्त सरप्राइज ठेवलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्यने धुरंधरचा अंतिम लुक रणवीरला देखील दाखवलेला नव्हता. रणवीरने जेव्हा या अफवांबद्दल विचारणा केली, तेव्हा आदित्यने सुरुवातीला काहीही नाकारलं. मात्र शेवटी त्याला कबूल करावं लागलं की हा लुक रणवीरच्या वाढदिवशी खासपणे प्रदर्शित होणार आहे.

Ranveer Singh dhurandhar 02

२०२३ मध्ये रणवीर सिंग ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये मुख्य भूमिकेत झळकला होता. त्यानंतर त्याने सिंघम अगेनमध्ये ‘सिंबा’ची छोटी पण प्रभावी झलक दाखवली होती. मात्र, धुरंधरमधील त्याचा अ‍ॅक्शन-ओरिएंटेड लुक त्याच्या चाहत्यांसाठी एक वेगळी मेजवानी घेऊन आला आहे.

‘An Inferno will rise. Uncover the true story of The Unknown Men’ या घोषवाक्यासह रणवीरने हा फर्स्ट लुक शेअर केला असून, धुरंधर हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. रणवीरच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या चित्रपटाबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Comment