सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. सिकंदरनंतर चाहत्यांना सलमानच्या जोरदार पुनरागमनाची उत्सुकता होती आणि अखेर त्याने आपल्या नव्या चित्रपटाचा लूक शेअर करत ती उत्सुकता वाढवली आहे.

सलमानचा आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लखिया करत आहेत. मोशन पोस्टरमध्ये सलमान मिशी लावलेला आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग असलेला दिसतो. त्याचा हा तीव्र लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
या चित्रपटात सलमान खान कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहे. त्यांनी 2020 मध्ये चीनसोबत गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात 16 बिहार रेजिमेंटचे नेतृत्त्व केले होते. भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात 15 व 16 जून 2020 रोजी झालेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. विशेष म्हणजे, शस्त्रास्त्र वापरण्यावर बंदी असल्याने हा संघर्ष हातघाई, दगड आणि लाठ्यांच्या साहाय्याने झाला.

हा चित्रपट ‘India’s Most Fearless 3’ या पुस्तकावर आधारित आहे, जे शिव अरोर आणि राहुल सिंग यांनी लिहिले आहे. चित्रपटाची कथा 15,000 फूट उंचीवर झालेल्या एका अशा लढाईवर आधारित आहे, जिथे एकाही गोळीचा वापर न करता भारताने शौर्य गाजवले. काही दिवसांपासून सलमानचा मिशीवरील नवीन लूक चाहत्यांच्या चर्चेत होता. त्यावरून चाहत्यांनी अंदाज लावला होता की तो युद्धभूमीवर आधारित काहीतरी करत आहे. अखेर सलमानने स्वतः हा लूक शेअर करून चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
या घोषणेनंतर सोशल मीडियावर सलमानच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सिकंदरनंतर एका गंभीर आणि देशभक्तिपूर्ण भूमिकेत सलमानला पाहण्याची इच्छा आता पूर्ण होणार आहे. चित्रपटाचे नाव, त्यामागची खरी घटना आणि सलमानचा लूक पाहता, हा चित्रपट देशभक्ती आणि शौर्याचं प्रतीक ठरणार आहे, अशी अपेक्षा आहे.
