अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) माजी वैयक्तिक सहाय्यिका वेदिका प्रकाश शेट्टी हिला मंगळवारी संध्याकाळी जुहू पोलिसांनी अटक केली. वेदिकावर बनावट कागदपत्रे तयार करून आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. तिने आलिया आणि तिच्या प्रोडक्शन कंपनी ‘इटर्नल सनशाईन प्रोडक्शन्स प्रा. लि.’ कडून एकूण 76 लाखांहून अधिक रक्कम फसवून घेतल्याचा आरोप आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिकाने दोन वर्षांच्या कालावधीत आलियाच्या स्वाक्षऱ्या बनवून तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या खात्यांतून स्वतःच्या खात्यात पैसे वर्ग करून घेतले. न्यूज 18 च्या अहवालानुसार, 2023 ते 2025 दरम्यान वेदिकाने 76,90,892 इतकी रक्कम लंपास केली आहे. फेब्रुवारी महिन्यात आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी वेदिकाविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एफआयआर दाखल होऊन तपास सुरू होता.
मंगळवारी मुंबई पोलिसांच्या पथकाने वेदिकाचा शोध घेत बेंगळुरूमध्ये तिला अटक केली. आता पोलिस तिच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहेत. अद्याप आलिया किंवा तिच्या टीमकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
वेदिका गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ आलियाच्या वैयक्तिक सहाय्यक पदावर होती. आलियाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यवहारांची व्यवस्थापन वेदिकाच करत होती, त्याचबरोबर ती प्रोडक्शन हाऊसचे सर्व कामकाजही पाहत होती.