६ जुलै रोजी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याने एक अनोखा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे चाहते चकित झाले आहेत.

शनिवारी, रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट्स हटवल्या आणि प्रोफाईल फोटो काळा ठेवला. त्याचबरोबर त्याने आपल्या स्टोरीमध्ये “12:12” असा मजकूर आणि दोन तलवारींचे चिन्ह शेअर केले. ही स्टोरी पाहून अनेक चाहते गोंधळात पडले आहेत.

काही चाहत्यांनी चिंता व्यक्त करत विचारलं, “सगळं ठिक आहे ना?” तर काहींनी अंदाज लावला की ही रणवीरच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असलेली युक्ती आहे. “धुरंधर” नावाच्या चित्रपटाचा टीझर ६ जुलै रोजी सकाळी १२:१२ वाजता येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बॉलिवूड हंगामा या वेबसाइटनुसार, रणवीरच्या वाढदिवशी “धुरंधर” चित्रपटाचा पहिला लूक प्रसिद्ध होणार आहे. एका सूत्राने सांगितले की, “हा दिवस खास बनवण्यासाठी दिग्दर्शक आदित्यने विशेष योजना आखली आहे. रणवीरला अंतिम व्हर्जन अजून दाखवलेलं नाही, त्यामुळे त्याच्यासाठी ही एक मोठी सरप्राईज ठरणार आहे.”
यामुळे ६ जुलैला येणाऱ्या “12:12” या क्षणाकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
